- ताथवडेतील निलकमल आणि साई दरबारवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२२) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हॉटेल आणि अन्य आस्थापना सुरू ठेवण्यासाठी वेळ ठरवून दिली आहे. मात्र, तरी देखील काहीजण या आदेशाला केराची टोपली दाखवतात. मंगळवारी (दि. ११) मुंबई – बंगळूर महामार्गावरील दोन हॉटेल्सवर वाकड पोलिसांनी कारवाई केली.
पहिल्या कारवाईत मोहम्मद मोईदुट्टी कल्लानाडी ( वय ३९, रा. ताथवडे, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुनील काटे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्लानाडी याचे मुंबई – बंगळूर महामार्गावर निलकमल नावाने हॉटेल आहे. त्याने शासनाने निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल सुरु ठेवले. त्यामुळे लोकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले.
दुसऱ्या कारवाईत साफीर मोईदुट्टी कल्लानाडी (४२, रा. ताथवडे, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रजनीकांत कोळी यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी साफिर याचे मुंबई- बंगळूर महामार्गावर साई दरबार नावाने हॉटेल आहे. दरम्यान, त्याने देखील निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल सुरु ठेवले. त्यामुळे साफिर याच्या हॉटेलवरही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.