- चिखली घरकुल योजनेतील ८४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२२) :- घरकुलच्या माध्यमातुन नागरीकांचे घराचे स्वप्न साकार होत असुन त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा. आपल्या परिसरात स्वच्छता ठेवावी व मिळालेली सदनिका विक्री अथवा भाड्याने देवु नये, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असुन या प्रकल्पातील २ सोसायट्यांच्या इमारती मधील एकुण ८४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत १३ जानेवारी २०२२ रोजी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग येथे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते काढण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहा. आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप, मुख्य लिपिक हनमंता निली, सुवर्णा केदारी, उज्वला गोडसे प्रोग्रामर, लिपिक योगिता जाधव, तसेच समन्वयक दर्शन शिरुडे यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. १४२ इमारत क्र. डी-५ चे अध्यक्ष लक्ष्मण रघुनाथ साळुंखे, सोसायटी क्र. १४३ इमारत क्र. बी-११ चे अध्यक्ष अजय श्रीकांत कुलकर्णी यांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थींनी आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारती भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे असे महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या.
अण्णा बोदडे सहा.आयुक्त यांनी प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. विष्णु भाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.