- पुणे, पिंपरी चिंचवडमधील कामगारांची सोय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- पिंपरीतील हिंदुस्तान अॅन्टीबायोटिक्स लिमिटेड कंपनीच्या जागेत क्षेत्रीय व झोनल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कार्यालय होणार आहे. नुकताच या जागेचा व्यवहार व नोंदणी पूर्ण झाली आहे.
त्यामुळे झोनल कार्यालय, क्षेत्रीय कार्यालय पुणे – १ (गोळीबार मैदान) व क्षेत्रीय कार्यालय पुणे – २ (आकुर्डी) या दोन्ही कार्यालयांचे कामकाज एकाच ठिकाणावरून होणार असल्याने कामगार व नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना क्षेत्रीय कार्यालय पुणे २ यांच्यावतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या कार्यालयांसाठी हिंदुस्तान अॅन्टीबायोटिक कंपनीकडून साडेतीन एकर जमीन ४२.०६ कोटी रूपयांना खरेदी करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. १३ जानेवारी २०२२) जमीनीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हे कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्याने कामगारांना त्याचा फायदा होणार आहे.