न्यूज पीसीएमसी नेटवर्क : पिंपरी :- स्वाइन फ्लू चा वाढता प्रभाव रोखण्याकरिता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये ”स्वतंत्र स्वाइन फ्लू” विशेष कक्ष स्थापन करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना पिंपरी विधानसभा मतदारसंघातर्फे करण्यात आली आहे. यावेळी पिंपरी विधानसभा शहर संघटक जितेंद्र ननावरे, समन्वयक किरण मोटे, विभागप्रमुख राजेश वाबळे, नगरसेवक निलेश बारणे, मुकेश कस्पटे, रवींद्र ओव्हाळ, शरण शिंगे, मनोज मातंग, राहुल कांबळे, गणेश झाडे, आदींनी वाय. सी. एमचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. पवन साळवे यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.
शहरातील अचानक वातावरण बदलामुळे स्वाइन फ्लू चा धोका वाढला असून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. गेल्या १५ दिवसात स्वाईन फ्लूने आठ रुग्ण दगावल्याने रुग्णालयामध्ये स्वतंत्र स्वाइन फ्लू कक्षाची निकड जाणवू लागली आहे. तसेच जानेवारी ते जुलै यादरम्यान केवळ एक रुग्ण या आजाराने दगावल्याचे निदर्शनास आले असून गेल्या ऑगस्ट महिन्यात एकूण १५ रुग्ण दगावले आहेत, त्यामुळे आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे लोकांचा जीव जात असून निगरगठ्ठ प्रशासनास जाग येणार तरी केव्हा? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने पाऊले उचलून नागरिकांमध्ये या रोगाबाबत जनजागृती करावी. तसेच स्वाइन फ्लू वरील प्रतिबंधात्मक ‘टॅमी फ्लू’ या ओषधांचा व स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लसीच्या माध्यमातून या रोगास प्रतिबंध करावा व लवकरात लवकर स्वतंत्र स्वाइन फ्लू कक्षाची स्थापना करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.












