- एकाचा जागीच मृत्यू; तर दुसरा गंभीर जखमी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२२) :- मावळातील आढले खुर्द येथे दोनच दिवसाआधी झालेल्या भांडणातून एकाने धारदार हत्यार चालवले तर दुसऱ्याने थेट मित्रावर तीन राऊंड फायरिंग केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे.
रोहन येवले (वय २१, रा. आढले खुर्द, मावळ) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अविनाश भोईर (वय २३, रा. आढले खुर्द, मावळ) असं गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, संशयीत आरोपी अविनाश भोईर आणि मृत रोहन येवले हे एकाच गावातील चांगले मित्र होते. तर, दोन दिवसांपुर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आज (शुक्रवारी) सकाळी त्यांच्यात पुन्हा वाद उफाळला. त्यावेळी रोहनने अविनाशवर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. अविनाश यानेही रोहनवर ३ राऊंड फायर केले. यात जखमी झालेल्या रोहनला सोमाटने फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु, उपचाराआगोदरच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.














