- नगरसेविका ममता गायकवाड यांच्या निवेदनाची आयुक्तांकडून दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जानेवारी २०२२) :- वाकड परिसरामध्ये द पॅथालॉजी लॅबने अनधिकृतरित्या फलकबाजी करत जाहिरात केली होती. या लॅबचालकावर महापालिकेने कारवाई केली असून त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनेक व्यावसायिक जाहिराती अनधिकृतरित्या लावतात. त्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होते. याबाबत स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका ममता गायकवाड यांनी आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत निवेदन दिले होते.
वाकड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फ्लेक्स स्टिकर व पोस्टरबाजीचे फेव फुटले आहे. याबाबत नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. वाकडमध्ये द पॅथालॉजी लॅबने अनधिकृत पद्धतीने जागा मिळेल तिथे पोस्टर लावत जाहिरात केली होती. महापालिकेच्या क्रीडा संकुलाच्या फलकावर देखील पोस्टर लावण्यात आले होते. याबाबत महापालिका प्रशासनाने द पॅथालॉजी लॅबच्या मालकावर कारवाई केली आहे. त्यांना २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
नगरसेविका ममता गायकवाड म्हणाल्या, द पॅथालॉजी लॅबने अनधिकृत पोस्टरबाजी करून परिसर विद्रुपीकरण केला होता. त्यामुळे त्यांच्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई केली आहे. यापुढे अशा प्रकारे अनधिकृत फ्लेक्स, स्टिकर होर्डिंग लावण्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये दंडात्मक कारवाईसोबतच फौजदारी गुन्ह्यांचा देखील समावेश असेल.