- शहरात येत्या शनिवारी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांचा ताफा होणार दाखल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जाने.) :- राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारच्या विरोधात राज्यभर हल्लाबोलच्या माध्यमातून रान उठवले होते. राष्ट्रवादीने हल्लाबोलच्या माध्यमातून भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत, सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. आता ‘निर्धार परिवर्तनाचा’ या यात्रेच्या माध्यमातून राज्यभर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटविले आहे. या निर्धार सभेने आपल्या पिंपरी चिंचवड शहराकडे मोर्चा वळविला असून, या यात्रेच्या निमित्ताने केंद्र व राज्य सरकाच्या कारभाराचे पुन्हा एकदा वाभाडे काढत, तो कारभार जनतेपर्यंत पोचवला जाणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.
‘निर्धार परिवर्तन’ यात्रेची माहिती देण्यासाठी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी वाघेरे बोलत होते. येत्या शनिवार (दि. २ फेब्रु.) रोजी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर सायंकाळी ५. ३० वाजता या परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेस संबोधित करण्याकरीता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे या नेत्यांचा ताफा शहरात दाखल होणार आहे.
यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भोईर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, योगेश गवळी, फजल शेख आदी उपस्थित होते.











