न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जाने.) :- सत्ताधा-यांना कुंभकर्ण निद्रिस्त अवस्थेतुन जागे करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राजकीय पक्ष, समाजिक संघटना व नागरिक यांच्या माध्यमातून उद्या गुरुवार (दि. ३१) रोजी दु. ३ ते सायं ६ या वेळेत “शंखनाद, घंटानाद” आंदोलन करण्यात येणार असल्याचे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे कळविले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत मागील चार वर्षात ४ वेळा शहरात येऊन अभिवचने दिली. एवढेच नव्हे तर चापेकर वाड्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात शास्तीकर शुल्क आकारण्याचे अधिकार महापालिकेला देण्यात येत आहेत, शास्तीकराचा मुद्दा महत्वाचा आहे. नियमितीकरणाचे शुल्क किती घ्यायचे? याचे अधिकार महापालिकेला दिले आहेत, असे जाहीर कार्यक्रमात फडणवीस यांनी म्हटले होते.
मुख्यमंत्री विविध प्रकल्प व पोलीस आयुक्त कार्यालयाच्या उद्घाटनाला बुधवार (दि. ९ जाने.) रोजी आले होते. त्यावेळी पिंपरी चिंचवडकरांची शास्तीची धास्ती पुढील १५ दिवसात घालवून टाकू, असे पुन्हा एकदा अभिवचन मा. मुख्यमंत्र्यांनी शहराला जाहीररित्या दिले होते. मागचा अनुभव पाहता शहर भाजपा व मुख्यमंत्र्याच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही महापालिका मुख्यालयाच्या समोर मुख्यमंत्र्यांची प्रतिमा लावून “काऊंट-डाऊन” आंदोलन सुरु केले होते. त्याची मुदत २४ जानेवारीला संपणार होती.
मात्र, महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदाधिका-यांनी रडीचा डाव खेळत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आदेश देऊन, महापालिका मुख्यालया समोरील आमचा मुख्यमंत्र्यांची प्रतिमा लावून आंदोलणाचा “काऊंट-डाऊन” फलक २१ जानेवारीलाच काढुन टाकला. त्याचा निषेध आम्ही २२ जानेवारीला आंदोलन करुन केला. मुख्यमंत्र्यानी दिलेल्या त्या १५ दिवसाची मुदत २४ जानेवारीला संपलेली असून, या विषयाबाबत सत्ताधारी भाजपा मिठाची गुळणी घेऊन कुंभकर्ण निद्रिस्त गेलेली आहेत. पिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर व अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत दिलेल्या आश्वासनाबाबत कुंभकर्णनिद्रिस्त सत्ताधारी भाजपाला जागे करण्यासाठी होणा-या “शंखनाद, घंटानाद” आंदोलनास उपस्थित रहावे, असे आवाहन भापकर यांनी या पत्राद्वारे केले आहे.











