न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जाने.) :- बहुजन सम्राट सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष निसर्गंध यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि. २९) पासून पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
यात नानासाहेब मांदळे, शिवशंकर उबाळे, बाबुराव मदणे, संतोष जोगदंड, धम्मराज साळवे, विक्रम ठोकळ, अविनाश भालेराव आदी सहभागी झाले आहेत. महापालिकेतील भ्रष्ट कारभाराला आवर घालण्याची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
संतोष निसर्गंध म्हणाले की, महापालिकेच्या कारभाराची तसेच आयुक्त हर्डीकर यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही. महापालिकेकडे साधी विचारणा देखील केली नाही. त्यामुळे महापालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. महापालिकेतील स्थायी समितीचा निर्धारीत कालावधी पुर्ण होत असल्याने जादा दराच्या निविदा मंजूर करण्याचा सपाटा सुरू आहे. ठेकेदारांना हाताशी धरून जादा दराचे निविदा मंजूर केल्या जात आहे. वाढीव दराची निविदा प्रक्रिया तसेच थेट पद्धतीने दिलेली कंत्राटे या कारभाराची चौकशी करण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा निसर्गंध यांनी दिला आहे.











