- त्या धाडसाबद्दल पोलीस आयुक्तांकडून पोलिसांचे कौतुक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२२) :- मध्यप्रदेश येथील नऊ सराईत गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कामगिरी करणाऱ्या गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी आणि सामाजिक सुरक्षा पथकाला एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हे बक्षीस जाहीर करीत पथकाचे कौतुक केले.
मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन मोटारीतून महामार्गावरून जाणार असल्याची खबर पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी उर्से टोल नाक्यावर सापळा रचून सहा आरोपी ताब्यात घेतले. डोंगरात पळालेल्या तीन आरोपींनादेखील अटक केली. दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घातल्याने गुंडा विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी शुभम कदम हे गंभीर जखमी झाले.
मात्र, तरी देखील जिवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी केली. कारवाईत जखमी झालेल्या शुभम कदम यांना पंचवीस हजारांचे बक्षीस जाहीर करीत त्यांची पाठ थोपटली आहे. त्यांच्या या धाडसाबद्दल कदम यांची शौर्य पदकासाठी शिफारस केली जाणार आहे.











