- ध्येय गाठण्यासाठी धीर धरावा लागतो, वेळही खर्च करावा लागतो – पांडाभाऊ साने..
- प्रभाग क्रमांक १ चिखली परिसरात बचत गटांच्या उद्घाटनांचा धुमधडाका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२२) :- एखादया नवीन संकल्पनेची सुरुवात करणे अवघड नाही, पण ती कल्पना सत्यात उतरविणे ही मात्र अवघड गोष्ट आहे. एखादे मूल चालायला शिकताना जसे पडते तसेच एखादी नवीन कल्पना राबवताना होते. मूल चालायला शिकत असते तेव्हा प्रथम बसते, रांगते, मग उभे राहू बघते. कधी कधी धडपडते, खाली पडते, नंतर अडखळत पावले टाकते. पण एकदा ‘चालणे’ शिकल्यावर मात्र पाळायला लागते आणि घरभर धावते. तसेच नवीन कामाच्या बाबतीतही घडते. सर्व प्रगती एका दमात होऊ शकत नाही. ध्येय गाठण्यासाठी धीर धरावा लागतो. वेळ खर्च करावा लागतो. प्रयत्न नेटाने करावे लागतात, तेव्हाच ध्येय साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन नवदुर्गा सखी मंचच्या अध्यक्षा रुपालीताई साने यांनी केले.

भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १ चिखली परिसरात लक्ष्मी-बालाजी स्वयंसहाय्यता महिला बचत गट, शिव पार्वती महिला बचत गट, साई समर्थ महिला बचत गट, संकल्प जरे आयकाॅन महिला बचत गट, संविधान महिला बचत गट, गजानन महिला बचत गट, पारिजातक महिला बचत गट, जय मल्हार बचत गट, धनलक्ष्मी अंगण महिला बचत गट, राशी महिला बचत गट, सखी महिला बचत गट अशा विविध महिला बचत गटांचा नुकताच उद्घाटन सोहळा रुपालीताई साने यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्या बोलत होते. यावेळी सामजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने, विविध महिला बचत गटांच्या अध्यक्षा, बचत गट महिला पदाधिकारी व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना रुपालीताई म्हणाल्या, स्वयंप्रेरणा हीच बचतगटांची गुरुकिल्ली असते. सुरुवातीला तिचे फारच महत्त्व आहे. काही महिला बचतगट स्थापन करण्यास अगदी सहज प्रेरित होतात. कारण त्यांच्या मनात एक आशा दडलेली असते. ती म्हणजे बचतगटाच्या कामांमुळे आपणास बाहेरील पैशांची मदत मिळेल. परंतु, काही महिला मात्र त्यांना खरोखर पैशाची गरज असूनही बचतगटाच्या कामापासून दूरच राहतात. त्यांना वाटते, बचतगट हे पैसेवाल्यांचे काम आहे, आपले नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत व वेळ आहे त्यांनीच हे करावे. आपण त्या भानगडीत कशाला पडायचे? आपल्यासाठी हे नाही. आपल्याजवळ बचत करायला पैसे आहेत कुठे? बचतगटात सामिल होण्याची आपली पात्रताच नाही, असेही त्यांना वाटते. काही महिलांना भिशी वगैरे गोष्टींचा काही वाईट अनुभव आलेला असतो, त्यामुळे मागील अनुभवाच्या धसक्याने त्या परत यात भाग घ्यायला तयार होत नाहीत. प्रभागातील महिलांमधील हा न्यूनगंड बाजूला सारून जनजागृती केली. महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने प्रभागातील अनेक महिलांनी पुढे येत बचत गट सुरु केले. बचत गटाद्वारे कर्जसुविधा, शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
पांडाभाऊ साने म्हणाले, नवदुर्गा सखी मंचच्या माध्यमातून प्रभागातील महिलांना बचतगट म्हणजे काय? तो कसा स्थापन करावा आणि कशासाठी स्थापन करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. केवळ बचतगट उघडून चालत नाही, बचतगटाच्या स्थापनेमध्ये गटाचे पैसे गुंतविलेले असल्यामुळे त्यात गटातील महिलांची धडपड व प्रयत्न यांचाही बराच मोठा वाट असतो. त्याचा उद्देश सफल करावयाचा असेल तर गटातील महिलांचा सहभाग, चर्चा आणि शंका निरसन करणे गरजेचे आहे, हे महिलांना पटवून देण्यात आले. चांगल्या तऱ्हेने काम करणाऱ्या बचतगटांचा भविष्यात यथोचित सन्मान केला जाईल.











