- चित्रफितीसाठी तब्बल आठ लाखांचा खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२२) :- महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत विकास योजना राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत चित्रफीत तयार करण्यात आली आहे. ही चित्रफीत तयार करणाऱ्या संस्थेला आठ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे शहरातील महिला, बालके मागासवर्गीय व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, अनाथ, निराधार या घटकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबविण्यात येतात. या योजनांतर्गत दिव्यांग योजनांचे अर्थसहाय देण्याचे काम जनसामान्यांपर्यंत महापालिकेतर्फे केले जाते. या चित्रफितीद्वारे कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे. तसेच महापालिकेला भेट देणाऱ्या मान्यवरांना अभ्यागतांना या चित्रफिती दाखविल्यास महापालिकेचा नावलौकिक वाढण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने ही चित्रफीत तयार करण्यासाठी २१ मे २०१८ रोजी जाहिरात संस्थांची निवड सूची तयार केली होती.
एस. बी. प्रोडक्शन यांचा लघुत्तम दर प्राप्त झाल्याने त्यांना कामाचे आदेश दिले होते. एस . बी प्रोडक्शन यांनी जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात दिव्यांग कल्याणकारी योजनांवर आधारित केलेली फिल्म निर्मिती सर्व मान्यवरांसमोर आणि दिव्यांगांना दाखवली. त्यानंतर संस्थेचे संचालक यांनी हे काम पूर्ण करून ७ लाख ९६ हजार रुपयांचे बिल सादर केले आहे. त्यानुसार त्यांना बिलाची पूर्तता केली जाणार आहे.


















