- एफएसआयसाठी क्षेत्रीय झोननुसार वर्गवारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने २०२० पूर्वी झालेली गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) आणि सामासिक अंतरे निश्चित केली आहेत. संबंधित नागरिकांकडून महापालिकेच्या बांधकाम नियंत्रण व परवानगी विभागाने अर्ज मागविण्यास सुरुवात केल्याने प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागणार आहे.
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमानुसार शहरात ३१ डिसेंबर २०२० पूर्वी झालेली गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे. नियमितीकरणासाठी बांधकाम कुठे व कोणत्या रस्त्यालगत आहे. त्यानुसार अ, ब, क, ड, इ व फ असे सहा झोन केले आहेत. त्यानुसार एफएसआय निश्चित केला आहे.
निवासी आणि वाणिज्य क्षेत्रातील व एफएसआयच्या मर्यादित राहून बांधकामे नियमित केली जाणार आहेत. तर नदी पात्रातील, निळ्या पूररेषेतील आरक्षणे, रेडझोन, बफर झोन, सरकारी जागेवरील शेतीझोन, नाला क्षेत्रातील बांधकामे नियमित होणार नाहीत. निवासी आणि वाणिज्य अशा मिश्र वापरासाठीचा (क झोन) एफएसआय वाणिज्य क्षेत्राच्या वापराच्या पटीत निश्चित केला आहे. निवासी व मिश्र वापराच्या इमारतींचा एफएसआय (ड झोन) रस्त्याची रुंदी व इमारतींच्या उंचीनुसार वेगवेगळा आहे. तसेच, भूखंडाच्या क्षेत्रानुसार निवासी व मिश्र वापराच्या इमारतींचा एफएसआय (इ झोन) त्यांच्या उंचीनुसार आणि सामासिक अंतराचा एफएसआय (फ झोन) बांधकामाचा प्रकार, इमारतींची उंची आणि रस्त्याची रुंदी यानुसार वेगवेगळा आहे.
रस्ता ९ मीटरपेक्षा कमी यात निवासी २.४०, वाणिज्य २.७०, ९ ते १८ मीटर ४.१६ ते ४.६८, १८ ते ३० मीटर ४.४८ ते ५.०४, ३० मीटरपेक्षा अधिक ४.४८ ते ५.०४ असा एफएसआय निश्चित केलेला आहे.


















