- महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२२) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळास वाढीव १२०० कोटी भाग भांडवल त्वरित द्या; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास भागभांडवल अत्यंत तुटपूंजे आहे. अनेक दिवस महामंडळ बंद अवस्थेत असल्याने मागील अनेक वर्षांचे भागभांडवल वायाच गेले आहे. या अनुषंगाने महामंडळास १२०० कोटी भागभांडवल त्वरित देऊन महामंडळ ताबडतोब चालू करावे. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या भागभांडवलामधून रु १ लाख ते ५ लाख रुपयेपर्यंतची थेट कर्ज योजना तात्काळ सुरू करावी, असेही म्हटले आहे.
बीजभांडवल कर्ज योजनेची मर्यादा ७ लाख रुपयांवरून १० लाखांपर्यंत करण्यात यावी. त्यामध्ये महामंडळाचा हिस्सा २० टक्के ऐवजी ४५ टक्के इतका व बँक कर्ज ५० टक्के, लाभार्थी हिस्सा ५ टक्के असावा. त्यासाठी तात्काळ शासन निर्णय काढून योजना पूर्ववत सुरू करावी. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर १० लाखांपर्यंतचा व्याज परतावा योजना तात्काळ सुरू करावी. अन्यथा महाराष्ट्रभर समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे अमित गोरखे यांनी पत्रात म्हटले आहे. पहिल्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेले १०० कोटी रुपये अजूनही मंडळाला प्राप्त झाले नाहीत, याचीही आठवण त्यांनी करून दिली.















