न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२२) :- भोसरीतील सूर्या इलेक्ट्रॉनिक्स व समर्थ मोबाईल हे दुकाने फोडून ६१ लाखांचे महागडे २४४ मोबाईल व एक टीव्ही चोरीला गेला होता. पोलिसांनी या परिसरातील १२५ सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये आढळलेल्या संशयित व्यक्तीचा तपास केला असता ते ठाण्यातील घोडबंदर येथे लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वैषांतर करून सापळा रचत तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चौकशीत इतर आरोपींच्या समवेत गुन्हे केल्याचे समोर आले. त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील २१७ मोबाईल व एक टीव्ही जप्त केला. त्याचा एक साथीदार हा झारखंड येथे असल्याचे समजल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र, तो पसार झाला.
आरोपी हे ठाणे येथील एका बांधकाम साइटवर दिवसभर काम करून रात्री पुणे परिसरात येऊन मोबाईल दुकानाची रेकी करायची व पुन्हा ठाण्यात जायचे. त्यामुळे त्यांचा संशय येत नसे. हे आरोपी सराईत असून त्यांनी झारखंड व पश्चिम बंगाल येथून महाराष्ट्र व इतर राज्यात जाऊन केवळ मोबाईलची दुकाने टार्गेट करायचे. त्यानंतर चोरीचे मोबाईल बांग्लादेशात जाऊन विकायचे. तेथे मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकात छेडछाड करायचे. त्यामुळे हे मोबाईल तांत्रिकदृष्ट्या ट्रेस होत नसत. मात्र, भोसरी पोलिसानी वेगवान तपास करून मोबाईल विकण्यापूर्वीच तत्काळ आरोपींना अटक केली. त्यामुळे या टोळीचा पर्दाफाश झाला.
जानिबुलहक मामुलत अली (वय ३३), जब्बार कुतुब अली (वय २९), जहागिरअलम मामुदी शेख (वय ३२, सर्व रा. तुरभा पाडा, ठाणे वेस्ट, मूळ पश्चिम बंगाल) यांना अटक केली असून आलम मोटू शेख (रा. झारखंड), नरइस्लाम उर्फ जंजाली मामुलत अली (रा. पुणे). अल्लाउद्दीन मामुलत अली (सध्या. रा. तुरभा पाडा, ठाणे वेस्ट, मूळ पश्चिम बंगाल) या आरोपींचा शोध सुरु आहे.