- विकासकामेही अपूर्ण; ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२२) :- महापालिकेची कामे पूर्ण न करता बँकेतून एफडीआरचे पैसे काढून महापालिकेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी येथे २७ जून २०२० ते २२ जुलै २०२१ या कालावधीत हाईलाही हसन शेख (वय ५७, रा. रुपीनगर, निगडी) यांनी याप्रकरणी सोमवारी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मे. डी. डी. कन्स्ट्रक्शनचे मालक दिनेश मोहनलाल नवाने (वय २८, रा. गेलार्ड चौक, पिंपरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे निविदेनुसार कामे मिळविण्यासाठी आरोपीने मे. डी. डी. कन्स्ट्रक्शन्स यांच्या नावाने एचडीएफसी बँकेचे एफडीआर बनविले. त्यानंतर महापालिकेची चार कामे पूर्ण केली नसताना तसेच महापालिका आयुक्तांची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता एफडीआर परस्पर मुक्त करून त्याचे पैसे एचडीएफसी बँकेच्या पिंपळे सौदागर शाखेतून काढून घेतले. अशा प्रकारे आरोपीने अटी व शर्तीचा भंग करून महापालिकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.