- पालिका भवनावर लागला ” स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ” चा नामफलक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२२) :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या स्वच्छ शहर स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला प्रथम स्थान मिळवून देण्याचा महापालिकेने संकल्प केला आहे. शहरवासियांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन शहराला स्वच्छ शहर बनवावे, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
केंद्र शासनाच्या पथकाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानअंतर्गत फेब्रुवारी महिन्यात पिंपरी चिंचवड शहराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्याअंतर्गत महापालिका भवनावर ” स्वच्छ सर्वेक्षण २०२२ ” असा आकर्षक नामफलक मंगळवारी (दि. २५) लावण्यात आला आहे.
सर्वेक्षणासाठी शहरातील रस्ते, उड्डाणपूल, पूल आणि मोकळ्या जागा स्वच्छ करण्यात येत आहेत. दुभाजक, पदपथ, बीआरटीचे बॅरिकेट्स, चौक, सीमाभिंती, स्मारक, पुतळे, झाडांचे खोड तसेच, झोपडपट्टीचे दर्शनी भागांची आकर्षक पद्धतीने रंगरंगोटी करण्यात येत आहे. सार्वजनिक शौचालये तसेच, उद्यानांची दुरुस्ती करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्या अंतर्गत महापालिका भवनावर ”स्वच्छ सर्वेक्षण २०२२” असा नामफलक लावण्यात आला आहे.