- चिंचवड स्टेशन येथील घटना; निगडी पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२२) :- टोळक्याने आरडाओरडा करीत दुकानासमोरील साहित्याने नुकसान करून दहशत माजवली. दुकानदार तरुणावर कोयता उगारून बेदम मारहाण करीत रोकड लुटली. हा प्रकार चिंचवड स्टेशन येथे घडला.
याप्रकरणी आकाश सीताराम अगरवाल (रा. दवा बाजारजवळ, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार इब्राहिम ऊर्फ इबु शेख (वय १९), अर्शद अस्लम अन्सारी (वय १९), स्वामी सय्यद पल्ले (वय २१), मौलाना महंमद कासीम (वय ३३), राजू जनक माजरे (वय २६, सर्व रा. साईबाबानगर, चिंचवड स्टेशन) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
गुरुवारी (दि. ३) रात्री साडे आठच्या सुमारास फिर्यादीच्या दुकानासमोर हातात कोयता घेऊन आलेल्या आरोपीनी आरडाओरडा करीत दहशत निर्माण केली. त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. दुकानाबाहेरील टेबल व सिमकार्डचे नुकसान केले. फिर्यादी दुकानाबाहेर आले असता आरोपी पल्ले याने कोयता उगारला. त्यानंतर सर्वांनी फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.