न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रु.) :- भाजपचे केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केंद्राचा २०१९ सालचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प नसून, शब्दांचा सुरेख लेख आहे. तसेच हा भाजपचा निवडणूक पूर्व अर्थसंकल्प असल्याचा आरोप, चिंचवड विधानसभा ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
मोदी सरकारने देशातील जनतेला दाखवलेले अच्छे दिन यातून मिळाले का? देशातील शेतकरी, कामगार, महिला यांना प्रगतीपथावर नेणारा हा अर्थसंकल्प आहे का? गंगा नदी साफ केली का? दररोज शेतकरी आत्महत्या करतो, सरकारने पाच वर्षे काय केले? बेरोजगारी, कामगारांचे प्रश्न, महागाई, युवक वर्ग आदींबाबत असे काहीच सकारात्मक या अर्थसंकल्पात दिसत नाही.
इंडिया शायनिंगचे काय झाले? २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? शेतकऱ्यांच्या पदरात सोळा रुपयांची भीक टाकणारी जुमलेबाजी घोषणा करून, गाजरांचे पिक काढणारा हा थापाडा अर्थसंकल्प असल्याची टीका, नवले यांनी भाजपवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.











