- विद्युत दाहिनीसाठी मनसेने केलेल्या प्रतिकात्मक तिरडी आंदोलनाला यश
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ फेब्रु.) :- निगडी स्मशानभुमीतील विद्युत दाहिनी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. कधी बंद तर कधी चालू अवस्थेत असलेली ही विद्युत दाहिनी पुन्हा कार्यान्वित होणार आहे. मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले यांनी केलेल्या वारंवारच्या पाठपुराव्यामुळेच ही बंद पडलेली ही विद्युत दाहिनी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सचिन चिखले यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, निगडी स्मशानभुमीतील विद्युत दाहिनी ही गेल्या बऱ्याच दिवसांपासून बंद आहे. या विद्युत दाहिनीचा कालावधी १० वर्षाचा होता. परंतू, १० वर्षे उलटूनही ५ वर्षानंतरही या दाहिनीचा वापर आहे त्या अवस्थेत सुरू आहे. ही विद्युत दाहिनी कधी बंद तर कधी चालू असल्यामुळे निगडी परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे एका मृतदेहावर अग्नि देऊन अंत्यविधी करताना तब्बल चार तासाहूनही अधिक वेळ लागत आहे. या विद्युत दाहिनीत निगडी, साईनाथनगर, यमुनानगर, सेक्टर २२, रूपीनगर, त्रिवेणीनगर, कृष्णानगर, संभाजीनगर, काळभोरनगर, आकुर्डी, प्राधिकरण आणि वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिक अंत्यविधी करतात. परंतू, बंद अवस्थेत असलेल्या विद्युत दाहिनीमुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत. मनसेनी या प्रश्नाला अनेकवेळा आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. नवीन विद्युत दाहिनी बसविण्याची मागणी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांना करण्यात आली होती.
मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्याकडून होत असलेली वारंवारची आंदोलने तसेच पाठपुराव्यामुळेच या विद्युत दाहिनीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. २२ जानेवारी १९ रोजी नवीन विद्युत दाहिनी बसविण्यास सर्वानुमते स्थायी समितीत मान्यता देण्यात आली. नगरसेवका साधना मळेकर यांनी यासंदर्भात सुचना मांडली, तर यशोदा बोईनवाड यांनी त्यांच्या या सूचनेला अनुमोदन दिले आहे. सदरची विद्युत दाहिनी बसविण्याचे काम मे. कल्याणी एंटरप्रायजेस या संस्थेला देण्यात आले आहे. या कामासाठी सुमारे ९७ लाख ७७ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या १ ते २ महिन्यात हे काम पुर्ण होणार असल्याची माहिती सचिन चिखले यांनी दिली आहे.











