न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ फेब्रु .) :- शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलास लांडे यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळत आहेत. परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने विलास लांडे यांनी शिरुर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदारांविरोधात फ्लेक्सबाजी करत वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे लांडे-आढळराव फाईट होण्याची चर्चा रंगली आहे.
चाकण येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीनंतर सक्रीय न दिसणारे विलास लांडे इतके वर्ष कुठे होते, असा सवाल करत लांडे यांना उमेदवारी म्हणजे त्यांचा बळीचा बकरा करण्याचे काम असल्याचे वक्तव्य केले. त्याला विलास लांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
विलास लांडे पलटवार करताना म्हणाले की, राष्ट्रवादीकडून आपल्याला अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही. केवळ फ्लेक्स लावले तर विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यातून उद्विग्न होवून ते अशी वक्तव्ये करु लागले आहेत. अजून कशात काही नसताना त्यांनी माझा धसका घेतला आहे. खरोखरच उमेदवारी जाहीर झाली तर त्यांना पळता भुई थोडी होईल. याची त्यांनाही जाणीव आहे.
त्यामुळे नुसत्या चर्चेने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. पालकमंत्र्यांनी माझी काळजी करण्यापेक्षा युतीची काळजी करावी. सत्तेत राहून वाटून खायचे आणि इतरवेळी सवतासुभा दाखवायचा ही शिवसेना-भाजप युतीची खेळी मतदारांनी जाणली आहे. जनतेला ‘बळीचा बकरा’ बनविणाऱ्यांचे आता ‘बुरे दिन’ सुरु झाले आहेत, असा टोला विलास लांडे यांनी लगावला.











