- पोलिसांच्या घटनास्थळी छापा; तिघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- चिखलीतील जाधववाडी येथील गंगारामनगर येथील रिव्हर रेसिडेन्सी ते रामकृष्ण हरी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या जय मल्हार गॅस या पत्र्याच्या खोलीत धोकादायकरीत्या घरगुती गॅस सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरणा सुरु होता. छोट्या सिलिंडर टाक्यांमध्ये गॅस भरून काळ्या बाजारात विक्री करून ग्राहकांची व शासनाची फसवणूक केली.
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून हजारांची रोकड, एक लाख ७२ हजार ५४९ रुपये किमतीचे २४ छोटया व ६१ अशा एकूण ८५ गॅस सिलिंडर टाक्या, दोन हजार ४०० रुपयांचे गॅस चोरी करण्याचे साहित्य, साडे चार लाखाची दोन वाहने असा एकूण सहा लाख ३१ हजार ९७९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी दुकान मालक इंद्रशेखर हनुमंतराव पंदारे (वय ३०, रा. डुडुळगाव), चालक लक्ष्मण मोहन म्हेत्रे (वय २३, रा. येणकी, पो होनाली, ता उदगीर जि. लातूर), साईनाथ मारुती शिरसेकर (वय १९, रा. अरुणनगर, मोशी यांना अटक केली आहे. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















