- पिंपळे सौदागरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२२) :- पिंपळे सौदागर येथे सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई काटे व उद्योजक संदीप काटे यांच्या वतीने शनिवारी (दि. १९) रोजी सालाबादप्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम अनिताताई काटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उद्योजक संदीप काटे, युवा नेते निलेश काटे, शंकर काटे, रामदास काटे, दत्ता हांडे, सुखदेव कदम, बाबा गायकवाड, चंदन काटे, दीपक नागरगोजे व पिंपळे सौदागर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना अनिताताई काटे म्हणाल्या, आपल्यापेक्षा प्रबळ शत्रुला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही. भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी-मनीही नव्हता. महाराजांची कार्यपद्धती नेमकी असायची. महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करायचे. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहेत. सर्व समाजाच्या विकासाची दिशा त्यांनी दाखवली. आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहे. जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे तेज, प्रेरणा आपल्या पाठिशी असणे आवश्यक आहे. अन्यथा स्व-विकासाची दिशा भरकटू शकते.
उपस्थितांनी ” छत्रपती शिवाजी महाराज की जय; जय भवानी जय शिवाजी” अशा घोषणा दिल्या.
















