- पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटनाची मागणी..
- पुण्यात विरोधक आक्रमक; मात्र, पिंपरी चिंचवड शहरात विरोधकांची चुप्पी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२२) :- आगामी महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका राजकीय पक्षांनी सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. यासाठी येत्या ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होणार आहे. अपूर्ण मार्गाच्या उद्घाटनावरून राजकीय वातावरण तापण्याचीच शक्यता आहे.
महापालिका निवडणुकीचा प्रारूप आराखडा जाहीर झाला आहे. हरकती सूचनांवर सुनावणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम आराखडा झाल्यानंतर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून उद्घाटन उरकण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्घाटनाला बोलविण्यासाठी केंद्र शासनाशी पत्रव्यवहार सुरू आहे.
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिपरी आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. दोन्ही पैकी एकाही मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. पिपरी ते स्वारगेट या १६.५ किलोमीटरपैकी केवळ पिपरी ते फुगेवाडी या ६ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. वनाज ते रामवाडी ( १४.६ ) या मार्गाचे काम प्रगतिपथावर त्याची पाहणी सुरू होण्यास आणखी तीन ते सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे उद्घाटनाची घाई करून केवळ अपूर्ण मार्गावर मेट्रो धावणार? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातून या उद्घाटनाला विरोधकांचा आक्षेप आहे. केवळ पंतप्रधान नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, असा पुण्यातील राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. मात्र दुसरीकडे मेट्रोचे सर्वात जास्त काम पिंपरी चिंचवड शहरात झालेले आहे. या उद्घाटनाबाबत पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडी अनभिज्ञ दिसत आहे. त्यामुळे त्यांची चुप्पी सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडणार अशी शक्यता दिसत आहे.
















