न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२२) :- ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्राची सुरुवात करून लोकशिक्षण, ज्ञानप्रसाराच्या उद्देशाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील दिलेले योगदान आधुनिक पत्रकारितेला सतत मार्गदर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक नगररचना उपसंचालक प्रशांत शिंपी, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, पत्रकार नाना कांबळे, बापूसाहेब गोरे, सूरज साळवे, दिलीप देहाडे, कलींदर शेख, अनिल भालेराव, प्रीतम शहा, संतोष जराड, गणेश शिंदे, दिपक श्रीवास्तव, गणेश मोरे, देवा भालके आदी उपस्थित होते.
दर्पण या मराठी भाषेतील वृत्तपत्राद्वारे पत्रकारितेची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. ते इंग्रजी राजवटीतील अनेक विषयांचे अभ्यासक, संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक आणि पत्रकार होते. जनतेला माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी बाळशास्त्रींनी केलेली पत्रकारिता आणि मराठी पत्रकारितेला दिलेला निर्भिड, नि:ष्पक्ष, लोकाभिमुखतेचा वारसा महत्वपूर्ण आहे, असे महापौर ढोरे म्हणाल्या.
















