न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ फेब्रु .) :- ”निर्धार परिवर्तन यात्रे” च्या निम्मिताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शनिवार (दि, २) रोजी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेस संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष करत जोरदार हल्ला चढवला. शहरातील गुन्हेगारी, शास्तीकर, अनधिकृत बांधकामे अशा महत्वाच्या प्रश्नांवर सत्ताधारी भाजप कमी पडला असून, शहरातील दोन शिलेदारांनी नदीआड व नदीपल्याड शहराची वाटणी करून, सवते सुभे उभे केले आहेत. कचरा समस्या असो की, महापालिकेचे विकासकामे असोत यात ठेकेदार पोसण्याचा धंदा या दोन शिलेदारांनी केला आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन बुजबळ, नेते दिलीप वळसे पाटील, युवा नेते रोहीत पवार, पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, योगेश गवळी, फजल शेख आदी उपस्थित होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, ”आता आम्ही सत्तेत नाहीत, तर कसे वाटते? असा खोचक सवाल शहरातील नागरिकांना केला. आज आम्ही सत्तेत असतो तर, मेट्रो चालू झाली असती. शहरातील विविध प्रश्न मार्गी लागले असते. जीएसटी, नोटाबंदी तसेच शिक्षणाचे बाजारीकरण करण्याचं काम भाजपने केले आहे. चुकीच्या धोरणांमुळे राज्य व केंद्र सरकारला अपयश आले आहे. भाजपच्या राज्यकर्त्यांना शहराचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही. या दरिद्री सरकारने आपली मुले चुकीच्या मार्गाने जावीत, म्हणून डान्स बारचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये जनतेने केलेली चूक पून्हा सुधारावी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पून्हा सत्तेवर आणावे, मग बघा विकास कसा पळतोय ते…” मावळ लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय मात्र, अजित पवार यांनी गुलदस्त्यातच ठेवला आहे.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, ”देशाच्या चौकीदाराने देशातील सुपुत्रांना देशोधडीला लावले आहे. साडेचार वर्षाच्या कार्यकाळात सर्वात जास्त बेरोजगारी निर्माण झाल्याचा अहवाल एका संस्थेने दिला आहे. मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. एकाला सुध्दा आरक्षण दिले नाही. राज्यात दुष्काळ पडला असून, फसणवीस सरकार मात्र डान्सबार सुरु करण्यात व्यस्त आहे.











