- पोलीस आयुक्तांकडून कर्मचारी तडकाफडकी निलंबित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२२) :- पेट्रोल पंप मंजुरीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रमाणपत्रासाठी दिवंगत नगरसेवकाच्या पत्नीकडून लाच घेतल्याप्रकरणी पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका मंत्रालयीन कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केली. महेंद्र नांदले असे निलंबित मंत्रालयीन कर्मचाऱ्याचे नाव आहे.
लष्करातून निवृत्त झालेल्या दिघी येथील दिवंगत नगरसेवकाच्या पत्नीने मुलाच्या नावे पेट्रोल पंप मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, पेट्रोलियम कंपनीने पेट्रोल पंप मंजूर केला. त्या जागेवर पोलिस ठाण्याचे आरक्षण असल्याने महिलेने जागा बदलून दुसऱ्या जागेवर पेट्रोल पंप मिळण्याची मागणी केली. यासाठी पेट्रोलियम कंपनीने जुन्या जागेच्या पंपाबाबत पोलिसांचे प्रमाणपत्र मागितले. त्यासाठी महिलेने पोलिस आयुक्तालयात अर्ज केला. त्यानंतर, प्रमाणपत्रासाठी तक्रारदार महिलेची मुलगी आयुक्तालयात नियुक्तीस असलेल्या नांदले याला भेटली असता त्याने प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागितले.
तक्रारदार महिला व त्यांच्या मुलीने नांदले याच्या फोनवर ऑनलाईन काही पैसे पाठवले. त्यानंतरही त्याला वेळीवेळी पैसे दिले. याबाबत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना माहिती मिळाल्यानंतर संबंधित महिलेला बोलावून तिच्याकडे चौकशी केली असता सर्व प्रकार समोर आला. यानंतर आयुक्तांनी मंगळवारी (दि. २२) नांदले याला तातडीने निलंबित केले.


















