- कामठे हे हातावर घड्याळ बांधण्याच्या तयारीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. फेब्रुवारी २०२२) :- पिंपळे निलख येथील भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी गुरुवारी (दि. २४) रोजी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मुख्य प्रवक्ते योगेश बहल, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे यांची उपस्थिती होती.
नगरसेवक तुषार कामठे यांचा राजीनामा हा चिंचवड मतदारसंघातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना थेट आव्हान असल्याचे समजले जाते. आमदारांच्या हुकूमशाहीला कंटाळून मी नगरसेवकपदाचा राजीनामा देतो आहे. अत्यंत चुकिच्या पद्धतीने यांनी कामे केली आणि महापालिका लुटली, अशी प्रतिक्रिया कामठे यांनी यावेळी दिली आहे. राष्ट्रवादीतील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राजीनामा दिल्याने ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे, पिंपळे गुरवच्या नगरसेविका चंदा लोखंडे, यांनीही दोनच दिवसांपर्वी भाजपाला रामराम केला आहे. आणखी २२ नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याने सत्ताधारी भाजपाचे नेते, पदाधिकारी हादरले आहेत.


















