न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२२) :- वाल्हेकरवाडीतील स्वप्ननगरी, सर्व्हे न.२२७ मध्ये तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आज शुक्रवारी (दि. २५) रोजी सायंकाळी ६.०० च्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरातील रहिवास्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. तातडीने अग्निशामक दलाला कळविल्यामुळे प्राधिकरण विभागातील दल तातडीने तिथे पोहचले.
सद्यस्थिती पाहता आगीवर नियंत्रण मिळवले जाईल असे दिसते. गॅस सिलेंडर गळतीमुळे आग लागल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आले. आगीत कोणीही जखमी नाही. घरगुती सामान मात्र जळून खाक झाले.
या संदर्भात प्रत्यक्षदर्शी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ”ही आग घरगुती गॅसमुळे लागण्याची शक्यता दिसून येते. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच अग्निश्यामक दलाच्या तत्परतेमुळे आग लागण्याच्या ठिकाणी तातडीने मदत मिळाली. समितीचे कार्यकर्ते संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी यांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. उन्हाळ्याची सुरुवात झाली असून नागरिकांनी घरगूती गॅसची गळतीबाबत अतिरिक्त दक्षता बाळगावी त्यामुळे अश्या घटना टाळता येतील.











