- अन्नधान्य कोट्यात बदल; मात्र लाभधारक सुरक्षित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२२) :- रेशन कार्डधारकांच्या धान्य पुरवठ्याचे शासनाकडून नव्याने नियोजन केले आहे. काही ठिकाणचा कोटा वाढविला आहे, काही ठिकाणचा धान्य वितरणाचा कोटा आवश्यकतेनुसार कमी केला आहे. मात्र असे असले तरी ज्या लाभधारकांना धान्य मिळत होते, त्यांच्या धान्य वाटपात कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही.
संबंधित लाभार्थींना पूर्वीप्रमाणेच लाभ मिळणार आहे. राज्यातील अनेक कुटुंबांनी स्थलांतर केल्याने त्यांचे वास्तव्याचे ठिकाण बदलते. अशावेळी त्यांना रेशनवरील धान्य मिळण्यात अडचणी येतात, यांसह इतर बाबींचा विचार करून शासनाकडून धान्य पुरवठ्यात बदल केला आहे. संबंधित रेशन दुकान धान्याच्या कोट्यात व संबंधित विभाग यातील आढावा घेऊन त्यांच्या धान्याच्या कोट्यात आवश्यकतेनुसार वाढ किंवा घट केली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची राज्यात २०१४ पासून अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून यात चारवेळा सुधारणा करण्यात आली. धान्यवाटप योजनेचा गरजूंना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वेळोवेळी आढावादेखील घेण्यात येतो.
सध्या धान्याचा पुरवठा होत आहे. त्यांच्या धान्य पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. नियमितपणे धान्य पुरवठा होणार आहे, अशी माहिती सचिन ढोले, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे यांनी दिली.












