- बेशिस्त नागरिकांवर ग्रीन मार्शल पथकाकडून होणार दंडात्मक कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२२) :- रस्त्यावर पडलेला पालापाचोळा आणि कचरा तसेच, तुटलेल्या दुभाजकामुळे शहर अस्वच्छ विद्रूप दिसत आहे. त्यामुळे रस्त्यावरील कचरा तातडीने उचलण्यासाठी महापालिकेने आता कर्मचाऱ्यांची रोड मार्शल म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते चकाचक दिसतील, असा दावा महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केला आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहराचे सर्वेक्षण मार्च महिन्यात होणार आहे. त्यासाठी शहरातील पदपथ दुभाजक, कठडे, झाडे, सीमा भिंती, झोपटपट्टीचा दर्शनी भाग आदींची रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच, उद्यानेही दुरुस्त करण्यात आली आहेत. तर, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर ग्रीन मार्शलकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तशा काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरीही, शहरातील रस्त्यांवर कचरा अस्वच्छ दिसतात. धूळ व माती साचलेली दिसते. त्यामुळे रस्ते सर्व मोठे रस्ते चकाचक दिसावेत म्हणून २२ फेब्रुवारी ते २२ मार्च असे एका महिन्यासाठी रोड मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य व स्थापत्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते निवडण्यात आले आहेत. रोड मार्शल हे नेमून दिलेल्या भागात दररोज गस्त घालतील. रस्त्यावर कचरा आढळल्यास तो कचरा तातडीने उचलला जाईल. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविणे, बीआरटीएस मार्गातील कचरा काढणे, बीआरटी मार्गातील तुटलेले दुभाजक दुरुस्तीसाठी संबंधित विभागास कळविणे आदी कामे रोड मार्शलच्या माध्यमातून केली जाणार आहेत. वाहनचालकांसाठी फलक व सिग्नल कार्यान्वित करणे, आपतकालीन परिस्थितीमध्ये प्रथम प्रतिसाद संघ ( फर्स्ट रिस्पॉन्स टीम ) म्हणून काम करणे आदी जबाबदारी रोडमार्शलवर सोपविण्यात आल्या आहेत. नागरिकांनी रस्त्यांवर कचरा टाकू नये नागरिकांनी तसेच, वाहनचालकांनी रस्त्यावर कचरा, खाद्य पदार्थाची पाकिटे व पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या टाकू नयेत. रस्त्यांच्या कडेला असलेल्या हँगिंग लिटर बिन्समध्ये कचरा टाकावा, असे आवाहन आयुक्त पाटील यांनी केले आहे.
शहरातील सर्व कचराकुंड्या उचलण्यात आल्या आहेत. तरीही काहीजण रात्रीच्यावेळी रस्ते, पदपथ, नाला, नदीकाठ आणि मोकळ्या जागेत कचरा टाकत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर ग्रीन मार्शल पथकाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, हे प्रमाण तुरळक असल्याने नागरिकांची बेशिस्ती वाढत असल्याचे दिसत आहे.











