- सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्राप्त खा. श्रीरंग बारणे यांचा शिवसेनेकडून सत्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मार्च २०२२) :- दिल्लीच्या तख्तावर स्वार झालेल्या हुकूमशाहीपुढे न झुकता खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी संसदेत शिवसेनेचा आवाज बुलंद केला. लोकांचे प्रश्न मांडताना त्यांच्यातील हाडाच्या शिवसैनिकाने मराठी मनाचा स्वाभिमान जपला. त्याची पोचपावती म्हणूनच खासदार बारणे यांचा सलग सातव्यांदा संसद रत्न पुरस्काराने गौरव झाला, अशा शब्दांत शिवसेना उपनेते तथा पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक मा. आमदार रवींद्रजी मिर्लेकर यांनी बारणे यांचे अभिनंदन केले.
सलग सातव्यांदा संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचा शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचे कौतुक करताना व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देताना मिर्लेकर बोलत होते. यावेळी सिनेट सदस्य तथा पिंपरी-चिंचवड विधानसभेचे संपर्कप्रमुख अॅड. वैभव थोरात, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक अॅड. सचिन भोसले, शहर संघटक संतोष सौंदणकर, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, रोमी संधू, विधानसभा शहर संघटक, शिवसैनिक आदी उपस्थित होते.
रवींद्रजी मिर्लेकर म्हणाले की, संसदरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी लोकहिताच्या प्रश्नांना संसदेत वाचा फोडावी लागते. केवळ प्रश्न मांडून भागत नाही, तर ते सुटेपर्यंत पाठपुरावा करावा लागतो. केंद्रातील हटवादी सरकारची शिवसैनिकांप्रती कायमच वक्रदृष्टी राहिलेली आहे. लोकांचे प्रश्न मांडल्यानंतर ते सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करताना शिवसैनिकाला प्रचंड त्रास सोसावा लागतो. पण, लोकांच्या प्रश्नांसाठी त्रास सहन करणार नाही, तो शिवसैनिक कसला ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारची कितीही कटू भावना असली तरी शिवसैनिक त्यांच्यापुढे कधीही डगमगणार नाही. लोकांच्या प्रश्नांसाठी अशा कट्टरवादी सरकारला ताळ्यावर आणल्याशिवाय तो राहत नाही. खा. बारणे यांनी नेमके तेच केले आहे. त्यामुळेच त्यांचा संसदरत्न पुरस्काराने गौरव केला जात आहे.
अॅड. वैभवजी थोरात म्हणाले की, खासदार आप्पा बारणे यांनी मावळ मतदार संघासह पिंपरी-चिंचवडमधील लोकांना भेडसावणारे प्रश्न मांडण्यास प्राधान्य दिले. शहरातील रेड झोनबाधित नागरिकांना यातून कायमचे बाहेर काढण्यासाठी त्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयात पत्रव्यवहार केला. बोपोडी येथील लष्कराच्या हद्दीतून खडकीला जोडणा-या उड्डाणपुलाच्या प्रश्नांसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून परवानग्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. एचए कंपनीच्या कामागारांचा प्रश्न असेल अथवा औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या जुलमी कारभार, याच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला आहे. असे अनेक प्रश्न मांडून लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्काराचा सन्मान मिळाला आहे.
















