- राष्ट्रवादी युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांची नामफलक सुशोभीकरणाची आयुक्तांकडे मागणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे काळेवाडी फाटा चौकास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे. या चौकातील नामफलकाची दुरावस्था झाली आहे. ही गोष्ट लक्षात घेता फलकाची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्वरित फलकाची दुरुस्ती करावी तसेच नामफलक सुशोभीकरण करून चौकाच्या मध्यभागी म्हणजे दर्शनी भागात बसवण्यात यावा, असे निवेदन आज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा व नावाचा वापर निवडणूक आल्यावर मत मिळवण्यासाठी करायचा आणि सत्ता आली की महापुरुषांच्या पराक्रमाचा विसर जाणीवपूर्वक पाडायचा भाजप प्रशासनाचा या पद्धतीचा पुतना मावशीचा प्रेमसबंध महाराष्ट्राला अवगत आहे मग ते भाजप उपमहापौर श्रीपाद छिदंमपासून राज्यपाल भगतसिंग कोशारीपर्यंत ही परंपरा कायम असल्याचे दिसून येत आहे. आता याचे अनुकरण पिंपरी चिंचवड महापालिका करत असल्याचे या नामफलक दुरुस्तीच्या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यामुळे शहरातील शिवभक्त यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणूकीत पिंपरी चिंचवडमधील शिवभक्त जनता नक्कीच यांना त्यांची योग्य जागा दाखवतील असे इम्रानभाई शेख म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष अमोल रावळकर, उपाध्यक्ष दिनेश पटेल, मुख्य संघटक शादाब खान, मुवाज मुजावर हे उपस्थित होते.
















