सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या कामावर तब्बल १० कोटींच्यावर खर्च
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज मंगळवार (दि. ५) रोजी सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लोकसभेची मार्चमध्ये आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे असल्याने, आपापल्या प्रभागातील कोट्यावधीच्या कामांना मंजुरी देण्याचा सपाटा चालूच आहे. या सभेत देखील स्थायी समितीने वाकड येथील कावेरी चौक-सब वे ते पिंक सिटी कॉर्नर पर्यंतच्या डी.पी. रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीट करण्यासाठी तब्बल २४ कोटी २४ लाख ४० हजार २४२ रुपयांना मंजुरी दिली आहे. हे काम निखील कंन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले आहे.
याबरोबरच रहाटणी परिसरातील श्रीनगर, गजानननगर, रायगड कॉलनी येथील अतंर्गत रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी सुद्धा स्थायी समितीने तब्बल १० कोटी ४१ लाख १२ हजार रुपयांना मंजुरी दिली आहे. याबरोबरच काळेवाडी फाटा ते छत्रपती चौकापर्यंतचा रस्ता सिमेंट कॉंक्रीट करण्यासाठी ८ कोटी ६३ लाख ७३ हजार रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच चऱ्होली येथे ही महापालिकेच्या आरक्षित जागेवर खेळाचे मैदान विकसीत करण्यासाठी ५ कोटी ७३ लाख ७६ हजार ११८ रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे
रहाटणी येथीलच कुणाल हॉटेल ते नखाते वस्ती या १२ मी रुंदीच्या मार्गासाठीही ४ कोटी ३० लाख ८९ हजार ४६३ रुपयेच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे केवळ सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी स्थायीने कोट्यावधींची उड्डाणे घेतली आहेत. या बैठकीत तब्बल ९२ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे.











