न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची तहकूब सर्वसाधारण सभा सोमवार (दि. ४) रोजी पार पडली. या सभेत टाळगाव, चिखली येथील संत तुकाराम महाराज संतपीठ उभारणीच्या कामास मंजुरी, भोसरीतील रुग्णालयाचा खाजगीकरणाचा घाट व आदी महत्वाचे विषय चर्चेसाठी होते. मात्र, सत्ताधारी भाजपने या सभेत कुरापती काढून सभेस दिशाहीन केले. तसेच यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिकाही संशयास्पद वाटत होती, असा आरोप शिवसेना व मनसेच्या गटनेत्यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज मंगळवार (दि. ५ ) रोजी पत्रकार परिषद घेऊन, याबाबत खुलासा केला आहे. साने म्हणाले की, संतपीठ विषयावरून मी बोलत असताना, माझ्या बोलण्यात माजी महापौर नितीन काळजे यांनी व्यत्यय आणला. तसेच महापौर राहुल जाधव यांची संशयास्पद हालचाल लक्षात घेऊन, मी व आमच्या पक्षाचे नगरसेवक महापौरांच्या पुढ्यात आले. त्याबाबत आक्षेप घेऊन आम्हाला विरोध करणे भाग होते. ती जबाबदारी आम्ही योग्यरीत्या पार पाडली आहे.
सभेतील विषय सभापटलावर न ठेवता अचानक मंजूर करणे घटनाबाह्य आहे. हे विषय मंजूर केले, तरी त्यांची अंमलबजावणी करण्यात येऊ नये, याकरीता आम्ही विरोध करणारच आहोत.
तसेच भोसरी रुग्णालय खाजगीकरण विषयामध्ये आमदार महेश लांडगे यांचा हात आहे. त्यांना महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना पोसायचे आहे. ते महापालिकेच्या पदाचा राजीनामा देऊन, रुग्णालयाचा कारभार चालवणार आहेत. आमदारांच्या पुढाकारानेच भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी तयार केला आहे, असा गौप्यस्फोट दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.











