- मनुष्यबळासाठी ४७ कर्मचाऱ्यांची उद्यान विभागात बदली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२२) :- ठेकेदारामार्फत चालविली जाणारी महापालिकेची सर्व सार्वजनिक उद्याने पालिका टप्प्याटप्प्याने स्वतः चालविणार आहे. पालिकेचे कर्मचारी उद्यानाची देखभाल, दुरुस्ती व निगराणी करणार आहेत. त्या अंतर्गत पालिकेचे १४ आणि पीएमपीएलकडून महापालिकेकडे वर्ग झालेले ३३ क्लीनर, हेल्पर असे एकूण ४७ कर्मचाऱ्यांची उद्यान विभागात बदली करण्यात आली आहे.
शहरात पालिकेची १८४ सार्वजनिक उद्याने आहेत. सर्व उद्याने सुशोभीत करण्यात आली आहेत. उद्यानात बालगोपाळांसह नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतात. तसेच, व्यायाम, चालण्यासाठी उद्यानात नियमितपणे नागरिक येतात. पालिकेने बहुतांश उद्याने ही ठेकेदारांना चालविण्यासाठी दिली आहेत. पालिका शहरात इंदूर पॅटर्न राबवित असून, त्या अंतर्गत स्वच्छतेसोबत उद्यानाचे काम पालिकेने स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मानधनावर उद्यानासाठी माळी नेमण्यात आले आहेत.
पालिकेचे ब क्षेत्रीय कार्यालय, लेखा, स्थापत्य मुख्यालय व नगररचना विभागाचे १४ मजुरांची उद्यान विभागात बदली करण्यात आली आहे. तर, पीएमपीएलचे ११७ कर्मचारी महापालिकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यापैकी ३३ क्लीनर व हेल्पर पालिकेच्या विद्युत, वैद्यकीय, पाणीपुरवठा, पशुवैद्यकीय, अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयात नियुक्त करण्यात आले होते. त्या ३३ कर्मचाऱ्यांची उद्यान विभागात बदली करण्यात आली, तसे आदेश आयुक्त पाटील यांनी काढले आहेत. उद्यान विभागात तत्काळ हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.