न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ एप्रिल २०२२) :- सर्वसामान्य नागरिकांना अग्निशमनाबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह’ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशामक विभाग आणि फायर ँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने उंच निवासी, वाणिज्य आणि मिश्र इमारतीमधील अग्निशमन आणि सुरक्षाविषयक उपाययोजना याविषयी शनिवार दि. ९ एप्रिल २०२२ रोजी परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अग्निशमन विभागात कार्यरत असताना आणि आपले कर्त्यव्य बजावताना हौताम्य पत्करणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिवस तर १४ ते २० एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून शासनाच्या निर्देशानुसार पाळण्यात येतो. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि देशातील अग्निशमन आणि सुरक्षाविषयक जनजागृती करणारी अग्रगण्य असणारी संस्था फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने चिंचवड येथील आॅटोक्लस्टर याठिकाणी सायं ५ ते ७ या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात अग्निशमन विषयक विविध अद्यायवत बाबींवर मार्गदर्शन, सूचना, सादरीकरण, चर्चा आणि प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. यामध्ये उंच इमारतीतील आगी लागण्याची कारणे, लागलेल्या आगी विझवण्यास येणाऱ्या अडचणी, बांधकाम आणि विद्युत विषयक बाबी, साइड मार्जिन, पार्किग क्षेत्र, रिफ्युज एरिया, फायर लिफ्ट, स्टेअर केस आदींचा समावेश आहे. .
जास्तीत जास्त नागरिकांनी या परिसंवादास उपस्थित राहून आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असणारे अग्निशमन विषयक असणारी माहिती घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.