- तीन दिवसांत होर्डिंगची मोडतोड; दंडही वसूल होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील खासगी जागेतील अनधिकृत जाहिरात होर्डिंग तीन दिवसांत काढून न घेतल्यास ती तोडून जप्त करण्यात येणार आहेत. त्याचा खर्च जागा मालकांकडून वसूल केला जाणार आहे. तसेच, तीन वर्षांचा परवाना शुल्क दंड म्हणून वसूल केला जाणार आहे, असा इशारा पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि. १२) दिला आहे.
पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात खासगी जागेत ५०० पेक्षा अधिक अनधिकृत होर्डिंग असल्याचे निर्देशनास आले आहे. अनधिकृत होर्डिंग पाडण्याची कारवाई आकाशचिन्ह व परवाना विभागाने सुरू केली असून, आतापर्यंत २८ होर्डिंग काढून जप्त करण्यात आले आहेत. त्यापूर्वी पालिकेच्या जागेतील १३५ होर्डिंग काढण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग नियमित करण्यासाठी आलेले ३८५ अर्ज आले होते. जागेची पाहणी व छाननी करून ते फेटाळण्यात आले आहेत. त्याही होर्डिंगवर कारवाई केली जाणार आहे.
होर्डिग काढून घेण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. मुदतीमध्ये होर्डिग काढून न घेतल्यास ते पालिकेकडून तोडले जाणार आहेत. त्याचा खर्च संबंधित जागा मालकाकडून वसूल करण्यात येईल. होर्डिगच्या माध्यमातून जागा मालकांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. मात्र, पालिकेस कोणतेही शुल्क भरले नाही. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. जागामालकांनी अनधिकृत होर्डिंग काढून घेऊन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.