- केंद्राच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२२) :- केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) च्या पिंपरी नेहरुनगर डेपोला प्रति किलोमीटर गॅस इंधनाचा कमी वापर केल्यामुळे बेस्ट डेपोचा पुरस्कार दिला. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि ७५ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
मुंबईतील नेहरू सेंटर येथे अन्न व पुरवठा मंत्रालयाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते पीएमपीच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केसरे आणि पिंपरी डेपोचे आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे यांनी पुरस्कार स्वीकारला. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने किलो मीटर पर केजी (KMPKG Improvement) ही स्पर्धा घेतली होती. त्यात पीएमपीच्या पिंपरी डेपोतील सीएनजी गाड्यांची पर किलोमीटरची क्षमता वाढलेली दिसून आली, त्यामुळे डेपोला बेस्ट डेपोचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याबाबत पिंपरी आगाराचे व्यवस्थापक भास्कर दहातोंडे म्हणाले, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक सीएनजीच्या वापरावर भर दिला. कटाकक्षाने त्याची अमंलबजावणी केली. सीएनजी गाड्यांची पर किलोमीटर कार्यक्षमता वाढली. हा पुरस्कार म्हणजे कार्यशाळा विभागातील कर्मचारी, सुपरवायझर, आगार अभियंता माने व ट्रॅफिक विभागातील सर्व चालक आणि इंधन सुपरवायझर राक्षे यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फलित त्यांचे कौतुक होत आहे.