न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रु.) :- आज व्यवस्थापन शिक्षणासाठी सात लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, त्यापैकी ५ टक्के कुशल विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते. आज विद्यार्थी शिक्षणाला कौशल्याची जोड देत नसल्याने ९५ टक्के विद्यार्थी बेरोजगार राहतात. बेरोजगारी हे देशासमोरील मोठे आव्हान बनले आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निबंधक व वाणिज्य / व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ प्रफुल्ल पवार यांनी केले.
चऱ्होली येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मॅनेजमेंट, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “उत्कर्ष-व्यावसायिक शिक्षण व बांधणी, कौशल्य, नाविन्यपूर्ण व उद्योजकता या विषयावर आयोजित परिषदेचे आयोजन केले होते. या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी डॉ. कुलदीप चरक, डॉ रुद्र रामेश्वर, डॉ बी. के गुप्ता, डॉ विनय कांडपाल, उद्योजक केतन गांधी, डॉ. ऱिपु रंजन, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, कॉर्पोरेट रिलेशन्स संचालक डॉ कमलजित कौर आदी उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले की, आज १.३ हजार कोटी युवक रोजगार मिळवण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र रोजगार मिळत नाही. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अनुमानानुसार २०२० पर्यंत १:२० ह. कोटी बेरोजगारांना रोजगार मिळण्याची आवश्यकता आहे. जनरल एंप्लॉयमेंटचा रेशो सध्या जागतिक स्तरावर २३ टक्के आहे, तर भारतीय मानव विकास संसाधनाच्या मते रोजंदारीचा दर ३० टक्के आहे. तरुणांनी स्वतःमध्ये नवनवीन कौशल्य आत्मसात करून, विकास साधला पाहिजे, असा सल्ला शेवटी दिला.
डॉ खेडकर म्हणाले कि, देशात ५४ टक्के तरुणांची संख्या आहे. देशातील तरुणांनी नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे. तरुणांचा विकास म्हणजेच देशाचा विकास होय. व्यावसायिक शिक्षण घेतांना कार्यक्षमता व कौशल्ये आत्मसात केल्यावर हा विकास जेव्हा होईल तेव्हा देशात परिवर्तन घडून आणण्याचे सामर्थ्य तरुणांमध्ये आहे. तरुणांनी व्यावसायिक शिक्षण घेताना नेतृत्वगुण, संभाषणकला, समस्या निवारण, कलाकृती, क्रिटिकल थिंकींग, माहिती तंत्रज्ञान, निरीक्षणशक्ती हे गुण आत्मसात केले पाहिजेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीकला बच्छाव यांनी, तर आभार प्रा. चेतन खेडकर यांनी मानले.










