- एका बिलाच्या वितरणासाठी येणार ३ रुपये २० पैसे खर्च…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२२) :- शहरातील मालमत्ताधारकांना मालमत्ताकराचे बिल थेट पोस्टाने घरी येणार आहे. एक बिल पोस्ट करण्यासाठी ३ रुपये २० पैसे खर्च येईल. शहरातील ५ लाख ७१ हजार मालमत्ताधारकांना बिल पाठविण्यासाठी १८ लाख २७ हजार २०० रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मान्यता दिली.
पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिकांना करसंकलन विभागाच्या वतीने मिळकतकराची बिले दिली जातात. मात्र, ही बिले वेळेवर मिळत नसल्याने त्याचा परिणाम कर वसुलीवर होत आहे. ही बाब आयुक्त राजेश पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गतिमान कारभार आणि सेवा देण्यासाठी निर्णय घेतला आहे. महापालिकेकडे ५ लाख ७१ हजार मालमत्तांची नोंद आहे. महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत शहरातील इमारती जमिनींवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. १६ विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून कर वसुलीचे काम केले जाते. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. मालमत्ताकराचे उत्पन्न वाढविण्यासाठी एप्रिल महिन्यातच मालमत्ताकरांची बिले पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठी बिलांची छपाई करून वितरित केली जाणार आहेत.
पुण्यातील विश्रामबागवाडा येथील पोस्ट ऑफिसच्या व्यवस्थापकांनी मालमत्ताकराची बिले माफक दरात वितरित करण्यास इच्छुक असल्याचे कळविले आहे. भारत सरकारच्या पोस्ट खात्यामार्फत सर्व करांसहित एक बिल वितरित करण्यासाठी ३ रुपये २० पैसे खर्च होतील. बिल पाठविण्यासाठी १८ लाख २७ हजार २०० रुपये खर्च येणार आहे. बिले वाटपासाठी टपाल खर्च लेखाशीर्षावर तरतूद आहे.
पोस्टमास्तर पुणे यांना बिले देण्याचा खर्च टपाल खर्च लेखाशीर्षातून करणे आवश्यक आहे. टपाल खर्च या लेखाशीर्षावर आर्थिक वर्षासाठी पाच लाखांची तरतूद आहे. बिले पाठविण्यासाठी १८ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे मिळकत सर्वेक्षण या लेखाशीर्षावर उपलब्ध असलेल्या १० कोटी रुपयांच्या तरतुदीमधून २० लाखांची तरतूद टपाल खर्च या लेखाशीर्षावर वर्ग केली आहे.
















