- अवैध धंद्यांना मोकळे रान?; पोलीस आयुक्तांच्या पोतडीत काय दडलंय?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०२२) :- पिंपरी – चिंचवडचे तिसरे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील अवैध धंद्यांवरील कारवाईसाठी सामाजिक सुरक्षा पथक स्थापन केले मात्र त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी आलेल्या अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच हे पथक बरखास्त केले. यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून आता अवैध धंद्यांना मोकळे रान मिळणार की, त्याविरोधात कोणती नवीन मोहीम आखली जाईल, याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात मोहीम हाती घेतली होती. २४ सप्टेंबर २०२० ला सामाजिक सुरक्षा पथक स्थापन करत विविध ठाण्यांसह क्राईम युनिट व विभागांच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. या पथकात एक पोलिस निरीक्षक, एक सहायक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व ३१ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
मटका, जुगार, लॉटरी, दारूधंदे, वेश्याव्यवसाय, स्पा सेंटर, बेटिंग, गौण खनिज उपसा, गुटखा आदी अवैध धंद्यांवर कारवाई सुरु केल्या. आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंद्यांना चाप बसला. नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केले जात होते. दरम्यान, गुरुवारी (दि. २२) शिंदे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी हे पथक बरखास्त केले. तसेच या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना मूळ नेमणुकीच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश रात्री उशिरा काढले.
१९ महिन्यात ७३० कारवाई पथकाने केल्या. यामध्ये मुद्देमाल जप्त करण्यासह आरोपींनाही अटक केली. दरम्यान, हे पथक आयुक्तालयांतर्गत असलेल्या विविध ठाण्याच्या हद्दीत जाऊन कारवाई करायचे. संबंधित धंद्याबाबत पथकाला माहिती मिळत असताना स्थानिक पोलिस मात्र अनभिज्ञ कसे? असा प्रश्न उपस्थित केला जायचा.