न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसला अच्छे दिन यावेत, याकरीता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने शहरात लक्ष देणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात राष्ट्रीय नेत्याची एकही सभा किंवा मेळावा शहरात झालेला नाही. त्यासाठी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाणांनी पुढाकार घेऊन, पिंपरी चिंचवड शहरात जाहीर मेळावा किंवा जनसंघर्ष जाहीर सभेचे आयोजन करावे, अशी मागणी चिंचवड ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी अशोक चव्हाणांकडे केली आहे.
गेल्या ४० वर्षांपूर्वी स्व. राजीव गांधी यांची जाहीर सभा पिंपरी येथे झाली होती. त्यानंतर एकही राष्ट्रीय नेत्याची सभा शहरात झालेली नाही. शहर कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याकरीता, पक्षाने अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करावे. आगामी निवडणुकीच्या निमित्ताने पुणे शहर किंवा जिल्ह्यात सभेचे आयोजन न करता, ती सभा शहरात घेण्यास पक्षाने प्राधान्यक्रम द्यावा. तसेच या सभेसाठी पुणे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी पिंपरी चिंचवड शहर हे जवळचे व सोयीचे स्थान आहे. पुणे शहरात सोय असली, तरी वाहतूक व रहदारीच्या दृष्टीने पुणे शहर सभेसाठी योग्य नाही.
सभेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील एच. ए. मैदान व सांगवीतील पी. डब्ल्यू. डी. मैदान सोयीचे व वाहतुकीच्या दृष्टीने योग्य आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील २१ व पुणे शहरातील ६ विधानसभा मतदारसंघ हे पिंपरी चिंचवड शहरापासून जवळ आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सभेसाठी शहरातील दोन्ही जागांची पाहणी करून, त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी नवले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.











