न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ फेब्रु.) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला धोका निर्माण झाला आहे. एकाधिकारशाही आणि धर्मांधता यांच्यापासून देशाला वाचविण्यासाठी कष्टकरी जनतेची संघटित होण्याची आवश्यकता आहे. कष्टकरी जनताच देशाचा खरा आधार आहे, यासाठी देशातील ४० कोटी कष्टकरी जनतेने एकत्र व्हावे, असे मत समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी व्यक्त केले.
कष्टकरी कामगार पंचायत वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नुकताच बांधकाम मजूर कष्टकरी मेळावा आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते.
यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष, बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी ऍड. संपतराव कांबळे, मेहबूब इनामदार, सलीम शेख, अरुण थोपटे, नवनाथ लोंढे, बि. आर. माडगूळकर आदी उपस्थित होते.
पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते बांधकाम मजूर महिलांना ओळखपत्र वाटप व बांधकाम मजुरांच्या मुलांना शिष्यवृत्ती फॉर्मचे वाटप करण्यात आले. तसेच बांधकाम मजुरांच्या योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले, माता रमाई त्यागमूर्ती आहे. त्यांच्याकडून त्यागाची प्रेरणा मिळते. गोरगरीब कष्टकरी जनतेच्या लढ्याची प्रेरणा मिळते. त्याग, बलिदानाशिवाय निश्चित यश प्राप्त होत नाही. बांधकाम मजुरांच्या प्रश्नांसाठी राज्यव्यापी लढा उभारला जाईल, ऍड. संपतराव कांबळे यांनी जनचळवळीचे गाणे म्हणून भाषणास सुरुवात केली. मेहबूब इनामदार, बि. आर. माडगूळकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी आणि धर्मराज जगताप, बळीराम काकडे प्रल्हाद कांबळे, कल्पना माने यांनी संयोजन केले.











