न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ८ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेक वादग्रस्त निर्णयास मंजुरी देण्यात आलेली आहे. या निर्णयांमुळे सत्ताधारी भाजपने केलेल्या पारदर्शक कारभाराची जनतेला प्रचीती आलेली आहे. जनतेच्या कररूपी पैशांवर दिवसाढवळ्या धाड टाकणाऱ्या या डोमकावळ्यांच्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दखल घेतली असून, महापालिका आयुक्त व महापौर यांना त्यांनी पत्र पाठविले आहे व त्यात सोमवार (दि. ०४) रोजी झालेली बेकायदेशीर मा. महापालिका सभा रद्द करावी, अशी मागणी केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची दि. १९/०१/२०१९ ची महापालिका तहकुब सभा सोमवार (दि. ०४) रोजी पार पडली. या सभेमध्ये टाळगाव चिखली येथील जगदगुरु तुकाराम संतपीठ या नावाने कंपनी स्थापन करुन, सदर कंपनीचे व्यवस्थापन चालवण्यासाठी संचालक मंडळाची स्थापना करणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सुमारे र. रु. २५ कोटी खर्च करुन, उभारलेले भोसरी येथील १०० बेडच्या रुग्णालयाची इमारत ३० वर्षासाठी खाजगी संस्थेला चालवण्यास देण्याचा विषय व पुणे महानगर परिवहन मंडळासाठी (पीएमपीएमएल) एकुण ४८० बसेस खरेदी करण्यासाठी २३८ कोटी ४५ लाख रुपये देणाऱ्या खर्चाला मान्यता देण्याचा विषयासह एकुण १२ विषयपत्रिकेवर होते.
या मा. महापालिका सभेतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. या गोंधळाचा फायदा घेत हे महत्वाचे व शहराच्या विकासावर व नागरी जीवनावर दुरगामी परिणाम करणा-या विषयांबाबत मा. महापौरांनी कुठलीही चर्चा होऊ न देता, मा. महापालिका सभेच्या कार्यपत्रिकेवरील प्रत्येक विषयांचे वाचन न करता किंवा रितसर सभापटलावर विषय न मांडता मा. महापौरांनी विषय क्रमांक १ ते १२ मंजूर केल्याचे जाहीर केले, अशा प्रकारे विषय मंजूर करणे सभाशास्त्राच्या नियमाला धरुन नाही. लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक असून हा सर्व कारभार हुकूमशाही पद्धतीने झाला आहे.
याच महापालिका सभेच्या कार्यपत्रीकेवर विषय क्रमांक २ पुणे महानगर परिवहन मंडळासाठी (पीएमपीएमएल) एकुण ४८० बसेस खरेदी करण्यासाठी २३८ कोटी ४५ लाख रुपये देणाच्या खर्चाला मान्यता देण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात आली होती. संतपीठाच्या कामाच्या निविदेत रिंग झाल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभाग्रहात गोंधळ घातला होता. या गोंधळात चुकून हा विषय मंजूर झाला. त्यामुळे तो मंजूर विषय पुन्हा नामंजूर करण्यात येणार आहे, असे मा. महापौर राहुल जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले आहे. म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सोमवार दि.०४/०२/२०१९ रोजी झालेली संपुर्ण मा. महापालिका सभाच बेकायदेशीर ठरत आहे. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर ठरुन, सभेत विनाचर्चा मंजूर झालेल्या विषयाची अंमलबजावणी करु नये. त्यामुळे लोकशाहीच्या सक्षमिकरणासाठी या बेकायदा सभेत मंजूर झालेले सर्व विषय रद्द करुन, ते सर्व पुन्हा मा. महापालिका सभेच्या विषयपत्रिकेवर घेऊन लोकशाही पद्धतीने त्या विषयांवर सांगोपांग चर्चा घडवून, लोकशाही पद्धतीचा अवलंब करुन, महापालिकेचे कामकाज व्हावे, असे भापकर यांनी त्या पत्रात नमूद केले आहे.











