- आर्थिक दंडाचीही शिक्षा; वाहतूक कोंडीबाबत पोलीस आयुक्तांकडून आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२२) :- फटाक्यासारख्या आवाजाचे सायलेन्सर लावून शहरभर ध्वनी प्रदूषण करणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी वाहतूक शाखेकडून गुरुवारपासून (दि. २८) विशेष मोहीम सुरू आहे. त्यात १३ विभागांमध्ये ३४६ वाहनचालकांवर ३ लाख ४६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
वाहतुकीची समस्या सोडविणे ही केवळ वाहतूक शाखेची जबाबदारी नसून त्यासाठी पोलिसांनीही पुढे यावे, अशा सूचना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा पोलीस ठाण्यांकडून वाहतूक आढावा घेण्यात येत आहे. तसेच शाखेकडूनही बेशिस्त वाहतूक वाहनचालकांवरील कारवाईत वाढ करण्यात आली आहे. त्यात विशेष मोहीम राबवून वाहतूक पोलिसांकडून बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली.
कंपनीकडून बुलेटसोबत आलेला सायलेन्सर बदलून फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या सायलेन्सरचा वापर केला जातो. यातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केले जाते. तसेच इतर वाहनचालक विचलित होऊन अपघात होऊ शकतो. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कारवाईबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी आदेश दिले होते.
विशेष मोहिमेंतर्गत सांगवी वाहतूक विभागाकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक कारवाई करण्यात आली. त्यासाठी सांगवी फाटा, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, कोकणे चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली.
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होत आहे. बुलेटचे बदललेले सायलेन्सर काढून कंपनीकडून मिळालेले ध्वनी प्रदूषण न होणारे सायलेन्सर बसवून घ्यावे, अन्यथा यापुढे दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल केले जातील. तसेच असे सायलेन्सर विक्री केल्याप्रकरणी संबंधित विक्रेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येतील. – आनंद भोईटे, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा, पिपरी – चिंचवड…