- येत्या ४ मेपासून धडक कारवाईच्या अधिकाऱ्यांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरातील प्रमुख रस्त्यांवरील व्यापारी गाळे, व्यावसायिक पत्राशेड आणि बांधकामांवर येत्या ४ मेपासून धडक कारवाई होणार आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शुक्रवारी बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच, कारवाईसाठी पोलिस आयुक्तांकडे अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.
शहरात प्रशस्त आणि सुंदर रस्ते विकसित करण्यात आले. मात्र शहरातील सर्वच ठिकाणी महामार्ग, प्रमुख रस्त्यांच्या बाजूने व्यापारी गाळे, व्यावसायिक पत्राशेड आणि अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने अशा अनधिकृत पत्राशेड, बांधकामांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. यापूर्वीच आयुक्त पाटील यांच्या निर्देशानुसार संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वाकड पूल ते वाकड स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता, भोंडवे कॉर्नर ते रावेत , मुकाई चौक, नाशिक फाटा ते मोशी या तीन रस्त्यांवर प्रामुख्याने कारवाई होणार आहे.
सुमारे सातशे बांधकामांना कारवाईच्या नोटिसा बजावल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या कारवाईबाबत आयुक्त पाटील यांनी शुक्रवारी बांधकाम परवाना विभागासह अतिक्रमणनिर्मूलन, स्थापत्य, विद्युत आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी येत्या ४ मे पासून धडक कारवाईचे निर्देश दिले आहेत.