न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मे २०२२) :- महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील ४ डॉक्टरांची थेरगाव रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. नव्याने कार्यान्वित थेरगाव रुग्णालयात इतर वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने या डॉक्टरांची बदली केली आहे.
सर्जन डॉ. कांचन वायकोळे, नेत्रतज्ज्ञ डॉ. राहुल गायकवाड, कान, नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. परमानंद चव्हाण, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सौरभ गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे.
महापालिकेने नव्याने ४ रुग्णालये सुरू केलेली आहेत. थेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय, आकुर्डी आणि भोसरी रुग्णालय यांचा त्यामध्ये समावेश आहे. या रुग्णालयासाठी नवीन इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. सद्य: स्थितीत या रुग्णालयात ऑपरेशन थिएटर, प्रसुती विभाग, प्रसुती पश्चात वॉर्ड, बालरोग विभाग, जनरल मेडीसीन विभाग, फिजिओथेरपी विभाग कार्यरत आहेत.
रुग्णालयात इतर वैद्यकीय सेवा देण्याचे प्रस्तावित आहे. या रुग्णालयांमध्ये दाखल वाढती रुग्णसंख्या, तेथील कामकाजाचे व्यापक स्वरुप पाहता वायसीएम रुग्णालयात कार्यरत तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची रुग्णालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने नवीन थेरगाव व जिजामाता रुग्णालयात नेमणुक करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वायसीएम रुग्णालयातून थेरगाव रुग्णालयात ४ डॉक्टरांची बदली केली आहे. त्याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.


















