न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ फेब्रु.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल येथील आरक्षित जागेवर उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ३ कोटी १३ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. याबाबत नगरसेवक विकास डोळस यांनी सांगितले की, बोपखेल-दिघी परिसरातील विविध आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. आरक्षण विकसित केल्यास प्रभागातील नागरिकांना त्या सुविधेचा उपयोग होईल. आरक्षणाचा मुख्य उद्देश देखील साध्य होणार आहे. आरक्षणे ताब्यात घेऊन विकसित केली जाणार आहेत.
महापालिकेची बोपखेल येथे आरक्षित जागा आहे. त्याठिकाणी महापालिकेतर्फे उद्यान विकसित करण्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या. त्यामध्ये सर्वाधिक कमी अर्थात ६.१ टक्के कमी दराची निविदा डी. डी. कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने सादर केली.
त्यांनी हे काम ३ कोटी ११ लाख ५ हजार ८०१ रुपये अधिक २ लाख २० हजार ५८४ रुपये रॉयल्टी आणि ५६ हजार १५० रुपये मटेरिअल टेस्टींग चार्जेस असे एकूण ३ कोटी १३ लाख ८२ हजार ५३५ रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे बोपखेल येथील महापालिकेच्या आरक्षित जागेवर उद्यान विकसित करण्याचे काम मेसर्स डी. डी. कन्स्ट्रक्शन यांना देण्यात येणार असून, त्याठिकाणी भव्य उद्यान विकसित करण्यात येणार असल्याची माहिती डोळस यांनी दिली आहे.










