न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ९ फेब्रु.) :- जगातील सर्वेक्षणानुसार २०३५ सालापर्यंत भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून अग्रस्थानी राहील, ही जशी आनंदाची बातमी आहे, तशी काळजी करण्याची बाब आहे. कारण अल्पवयीन गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून तरुणाईला जर सकारात्मक आणि विधायक मार्गाकडे वळवले तर समाजातील मानवी दुष्प्रवृत्ती नष्ट होतील, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयांतर्गत चिंचवड पोलीस स्टेशन आयोजित मोरया गणेशोत्सव पुरस्कार २०१८ चा पारितोषिक वितरण समारंभ चिंचवड येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी टाटा मोटर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक (मनुष्यबळ) सतीश मोटे, चिंचवड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, सांगवी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, गुन्हे शाखा निरीक्षक विश्वजित घुले, मोरया पुरस्कार समिती अध्यक्ष सुभाष मालुसरे, नगरसेवक सुरेश भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गांधीपेठ तालीम मित्रमंडळाला गणेशोत्सव स्पर्धा २०१८ च्या मोरया फिरता करंडकाने सन्मानित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत या पुरस्काराचा स्वीकार केला. यावेळी इतर गणेश मंडळांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.










